रिकट द्राक्षबाग व्यवस्थापन:
रिकटनंतर नवीन फुटींना जोमदार वाढ मिळावी म्हणून खत व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. योग्य रिकट व्यवस्थापन केल्यास वेलींची वाढ एकसारखी होते आणि लवकर फळधारणा सुरू होण्यास मदत होते. या वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या प्रमाणात अन्नद्रव्यांची गरज भासते. लगेच उत्पादन घेण्याचे नियोजन असल्यास, हे व्यवस्थापन अधिक महत्त्वाचे ठरते. मुख्य अन्नद्रव्यांबरोबरच सूक्ष्मअन्नद्रव्यांचे नियोजनही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांचा उपयोग प्रामुख्याने फवारणीद्वारे करावा.
मुख्य अन्नद्रव्यांचे (नत्र, स्फुरद, पालाश) योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही तिन्ही अन्नद्रव्ये रिकटनंतरच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी भूमिका बजावतात आणि त्यांचा समतोल वापर केल्यास वेलीची जोमदार वाढ होऊन ती लवकर फळधारणेस सज्ज होते
कॅल्शियम : कॅल्शियम हा वनस्पतींच्या पेशीभिंतीचा (cell wall) एक महत्त्वाचा घटक आहे. तो पेशींमध्ये ‘सिमेंट’चे काम करतो, ज्यामुळे पेशी एकमेकांशी चिकटून राहतात. येणाऱ्या नवीन, कोवळ्या फुटीला बळकटी मिळते. कॅल्शियमच्या पुरेशा उपलब्धतेमुळे फुटी लवकर ताठ आणि मजबूत होतात, ज्यामुळे त्यांना वाऱ्याचा किंवा किडींचा धोका कमी होतो.
सूक्ष्मअन्नद्रव्य:
- लोह (Fe) : हरितद्रव्य निर्मितीसाठी आवश्यक. कमतरतेमुळे नवीन पाने पिवळी पडतात.
- जस्त (Zn) : वाढ संप्रेरक निर्मितीसाठी आवश्यक. कमतरतेमुळे पाने लहान राहतात व ढगळ येतात.
- मॅंगनीज (Mn) : प्रकाश संश्लेषण क्रियेत महत्त्वाची भूमिका.
- बोरॉन (B) : पेशीभित्तिका निर्मिती व शर्करेच्या वहनासाठी आवश्यक.
खालील दिलेल्या सर्व शिफारसी विद्राव्य खतांच्या आहेत व त्या ठिबक सिंचनाद्वारे (फर्टिगेशन) विभागून द्याव्यात.

